भिशी केवळ बचतीचे नव्हे, समाजसेवेचेही क्षेत्र असावे!
महाराष्ट्र राज्य महिला प्रमुख- परविना जमादार. मो. 7559491729

भिशी केवळ बचतीचे नव्हे, समाजसेवेचेही क्षेत्र असावे!
आजच्या काळात भिशी म्हटलं की अनेकांना ती केवळ मनोरंजन, गप्पा किंवा आर्थिक देवाणघेवाणीचे साधन वाटते. परंतु सांगलीतील ‘घे भरारी’ या भिशी समूहाने त्या पारंपरिक चौकटीला छेद देत समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून एक नवा आदर्श निर्माण केला आहे, भिशी हे समाजसेवेचेही क्षेत्र असावे, असे प्रतिपादन माजी नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस डॉ. ज्योती आदाटे यांनी केले.
येथील ‘घे भरारी’ भिशी ग्रुपच्यावतीने नुकताच डॉ. आदाटे यांना मिळालेल्या मानद डॉक्टरेट पदवीनिमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात मराठा उद्योजक कक्षाच्या प्रमुख आशा पाटील, उद्योगपती नाझिया शेख, अंकलेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालिका शितल चौगुले, प्रा. अरुणा सूर्यवंशी व शास्त्रज्ञ प्रेम पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
डॉ. आदाटे म्हणाल्या, “स्त्रियांची आर्थिक सक्षमता हीच सामाजिक प्रगतीची पहिली पायरी आहे. भिशी म्हणजे केवळ बचतीचा मार्ग नाही, तर ती महिलांना एकत्र आणणारी, विचारांना दिशा देणारी आणि समाजात परिवर्तन घडवणारी चळवळ आहे. भिशीच्या माध्यमातूनही सामाजिक बांधिलकी जपत समाजकारण करता येते, हे ‘घे भरारी’ समूहाने दाखवून दिले आहे. अशा गटांचा आदर्श इतर भिशी गटांनी व बचत गटांनी घ्यावा. सांगलीतील ‘घे भरारी’ सारखे गट महिलांच्या य जेनेतृत्वातून नव्या सामाजिक ऊर्जेचा संदेश देत आहेत हीच खरी सकारात्मक बदलाची सुरूवात म्हणावी लागेल”.
कार्यक्रमाला गुलाबराव पाटील महाविद्यालयाच्या प्रमुख विजयाताई पाटील, तसेच अंनिसच्या प्रियंका तुपलोंडे, शरयु पाटील, क्रांती कदम यांसह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या.महिला मेळाव्यात प्रमुख पाहुणी म्हणून डॉ ज्योती आदाटे यांनी मार्गदर्शन केले.